Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये सकाळीच थरार! जुन्या वादातून बँक कर्मचाऱ्यावर गजबजलेल्या रस्त्यात चाकूने प्राणघातक हल्ला



गडहिंग्लज (प्रतिनिधी): घरानजीकच्या जागेच्या जुन्या वादातून एका बँक कर्मचाऱ्यावर भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची सनसनाटी घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने गडहिंग्लज शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वीरपाक्ष शिवाप्पा रामपुरे (रा. हेब्बाळ क. नूल, ता. गडहिंग्लज) असे गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सतीश सुरेश कुरणे याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.



पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी वीरपाक्ष रामपुरे हे गडहिंग्लज शहरातील एका बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आज, शुक्रवारी दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गडहिंग्लज - संकेश्वर मार्गावरील गडहिंग्लज अर्बन बँकेसमोर ते जात असताना, संशयित आरोपी सतीश सुरेश कुरणे (रा. हेब्बाळ) याने त्यांना गाठले.


हेब्बाळ येथील राहत्या घराला लागून असलेल्या जागेवरून आरोपी व जखमी यांच्यात जुना वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून कुरणे याने वीरपाक्ष यांच्यावर जीवे मारण्याच्या हेतूने धारदार चाकूने अचानक वार केले. संशयिताने वीरपाक्ष यांच्या छातीत आणि पोटात चाकू खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.


घटनेनंतर हल्लेखोर फरार


सकाळच्या वेळी अत्यंत गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हल्ला केल्यानंतर संशयित कुरणे हा  घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी वीरपाक्ष यांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

याप्रकरणी जखमीचे ८० वर्षीय वडील शिवाप्पा इराप्पा रामपुरे यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सतीश सुरेश कुरणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी केली असून, पोलीस उपनिरीक्षक केरूरकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.