शाश्वत पर्यावरणासाठी सामुदायिक प्रयत्नांची जोड
सरपंच परिषदेतर्फे मोफत रोपांचा पुरवठा
आजरा (हसन तकीलदार): बदलत्या हवामानाचे संकट आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी आता शेतकरीच पुढे सरसावले आहेत. आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथील गायराण क्षेत्रात 'रणरागिणी शेतकरी गटा'च्या वतीने तब्बल २०० देशी वाणांच्या वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. शेतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा हा आदर्श उपक्रम स्थानिक ग्रामस्थ आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती आजराचे कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनिस, कृषी सहाय्यक तृप्ती पाटील व योगेश जगताप यांच्या शुभहस्ते रोपे लावून करण्यात आले.
शेती आणि पर्यावरण रक्षणासाठी गटशेतीचा मार्ग: जी. एम. पाटील
उपस्थितांशी संवाद साधताना जी. एम. पाटील म्हणाले, तापमानवाढीमुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि वादळांसारख्या संकटांचा थेट फटका शेतीला बसत आहे. झाडांची संख्या घटल्याने परागीभवनावर आणि पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा वेळी रणरागिणी शेतकरी गटाने वृक्षलागवडीचा घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. शेतीचा अभिमान बाळगून अशा उपक्रमांतून समाजाची मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होईल.
शेतकरी गटाच्या महिला निमंत्रक सौ. नीता बोलके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर पुरुष निमंत्रक किशोर कातकर यांनी गावात यशस्वी ठरलेल्या 'सामुदायिक शेती' संकल्पनेची माहिती देत, एकत्र काम केल्यास अवघड ध्येयही सहज साध्य होते, असा विश्वास व्यक्त केला.
कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे यांनी रणरागिणी गटाच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करत, गटाने जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कामाचा विस्तार करावा, असा सल्ला दिला. या उपक्रमासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून विनामोबदला झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल गटाच्या वतीने इंजि. जी. एम. पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील उत्तम कातकर, देवेंद्र बोलके, शिवाजी कोलेकर, ज्ञानदेव बोलके, कविता बोलके, सौ. अश्विनी कोळेकर, सौ. गीता बोलके, सौ. मंगल बोलके, सौ. पुष्या बोलके, सौ. रुपाली कोळेकर, सौ. सारिका बोताक, सौ. सरिता बोलके, सौ. शालन डोंगरे, सौ. सुनिता कोलेकर, सौ. सुवर्णा भादवणकर यांच्यासह रणरागिणी शेतकरी गटाचे महिला व पुरुष सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव यांनी आभार मानले.

