Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’ : सीपीआरमध्ये लवकरच IVF, बोनमॅरोसह चार अत्याधुनिक उपचार; मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा



कोल्हापूर:  येथील सीपीआर रुग्णालयाचा कायापालट करत कोल्हापूरवासीयांना अत्यल्प दरात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याच साखळीत आता सीपीआरमध्ये लवकरच IVF, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॅथ लॅब आणि ट्रॉमा ICU या चार महत्त्वाच्या सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.


शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.



पंतप्रधानांच्या हस्ते ३१ मार्च २०२७ पर्यंत लोकार्पण


शेंडा पार्क परिसरात सुरू असलेल्या विविध नवीन इमारतींचे बांधकाम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल. या भव्य प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्याचा विचार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.


सर्किट बेंचजवळील ५ हेक्टर जमिनीची मागणी 


शेंडा पार्कमधील सर्किट बेंचला दिलेल्या जमिनीलगतची उर्वरित ५ हेक्टर जमीन वैद्यकीय विस्तारासाठी मिळावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महाविद्यालयांच्या कामांना गती


मौजे सांगाव शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर - शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय, कागल ग्रामीण आरोग्य पथक या सर्व ठिकाणी मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.



मूलभूत सोयी-सुविधांवर भर


सर्व प्रकल्पस्थळी पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प  यांसारख्या आवश्यक बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक  


सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण अत्यंत वेगाने आणि उच्च दर्जाचे केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केले. या उत्कृष्ट कामाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीही घेतली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.


या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. भाग्यश्री खोत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.