Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात महावितरणच्या हुकूमशाहीविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक: स्मार्ट मीटरचा भव्य तिरडी मोर्चा!

जाग्यावरच महावितरणला घ्यावे लागले नमते; मुख्य मागण्यांचे लेखी आश्वासन पदरात पाडून आंदोलनाचा दणकेबाज विजय




आजरा (हसन तकीलदार): महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांवर लादली जाणारी स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीज बिलांचा मनस्ताप याविरोधात आजरा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रचंड आक्रोश पहायला मिळाला. या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षाने सक्रिय पाठिंबा दिल्याने मोर्चाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. छत्रपती संभाजी चौकातून निघालेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरची 'तिरडी' मारून घोषणाबाजीत महावितरणच्या दारात ती ठेवली आणि मडके फोडून निषेध नोंदवला. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाला जाग्यावरच नमते घ्यावे लागले असून, अनेक महत्त्वाच्या मागण्यांचे लेखी पत्र अधिकाऱ्यांकडून मिळवण्यात आंदोलकांना यश आले आहे.


महावितरण कार्यालयावर धडक दिल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप पाटील (गडहिंग्लज) व उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील (आजरा) यांना मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला.


 स्मार्ट मीटर सक्ती बंद करा


ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची स्मार्ट मीटरची सक्ती केली जाऊ नये. ज्या ग्राहकांनी नवीन मीटर बसवलेले नाहीत, त्यांना मुद्दाम भरमसाठ बिले पाठवून मीटर बदलण्यास भाग पाडले जात आहे, ही दादागिरी तात्काळ थांबवावी.  ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर काढून त्यांना पूर्ववत जुनेच मीटर बसवून द्यावेत. तसेच रीडिंगनुसार बिल दुरुस्ती करून मिळावी. शासनाच्या ७.५ एच.पी. शेतीपंप वीज बिल माफीचा फायदा रोखण्यासाठी अनेक ७.५ एच.पी. धारकांना १० एच.पी. ची फुगवलेली बिले पाठवण्यात आली आहेत. या अर्जांचा निपटारा करण्यासाठी तात्काळ विशेष 'कॅम्प' आयोजित करावा.  शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या जळीताची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. शेतातील घरांसाठी वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज आणि गावातील धोकादायक वीज खांब बदलण्याचे काम त्वरित सुरू करावे. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


नेत्यांचा घणाघात व प्रशासनाची माघार


यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख युवराज पोवार, भुदरगड उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, कॉ. शांताराम पाटील आणि बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी आपल्या भाषणांमधून महावितरणच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चाचे सर्वात मोठे यश म्हणजे, अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन न देता शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे झुकत प्रमुख मागण्या जाग्यावरच मान्य केल्या आणि त्याचे लेखी पत्र आंदोलकांच्या हाती सुपूर्द केले.



या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, दयानंद भोपळे, हरिभाऊ कांबळे (जय शिवराय शेतकरी संघटना), समीरभाई चांद, संजय येसादे, विश्वास किल्लेदार, शिवाजी आडाव, हरिश्चंद्र व्हराकटे, सुयश पाटील, महेश पाटील, रवींद्र सावंत, गीता देसाई, दिनेश कांबळे, अमित गुरव, दत्तात्रय पाटील, रोहन गिरी, बिलाल लतीफ, डॉ. रोहन जाधव, अबूहुरेर माणगावकर, नदीम तकीलदार, देवदास बोलके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.


कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आजरा पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.