गडहिंग्लज (अमर डोमणे ) : कर्तव्यनिष्ठा, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जागेवरच उकल करण्याची तत्परता... याच लोकभिमुख सेवेची दखल घेत तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांना महसूल विभागाच्या वतीने अत्यंत मानाच्या ‘आदर्श मंडळ अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गडहिंग्लज महसूल विभागाच्या वतीने नुकतेच विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार शिवाजी पाटील, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे आणि तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या शुभहस्ते जिनराळे यांना पुरस्कार, सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रशासनात निर्माण केला वेगळा ठसा
महसूल विभाग हा थेट जनतेशी निगडित असणारा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात कार्यरत असताना आप्पासाहेब जिनराळे यांनी नेहमीच 'शासकीय सेवा हीच लोकसेवा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून काम केले. क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या महसुली प्रकरणांमध्ये सुलभता आणून त्यांनी सर्वसामान्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ केला आहे. त्यांच्या या निष्कलंक व कार्यक्षम प्रवासाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
तेरणीच्या शिरपेचात आणखी एक तुरा
आपल्या गावच्या सुपुत्राने प्रशासकीय सेवेत मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे तेरणी गावामध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे. पुरस्काराची बातमी समजताच तेरणी परिसरासह संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील भावी प्रशासकीय वाटचालीस विविध स्तरातून उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.


