Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात; मक्का-मदिनाच्या प्रतिकृतीने वेधले लक्ष

                                                 छायाचित्र : मज्जीद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): परोपकार, दानधर्म, मानवता आणि विश्वशांतीची शिकवण देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती 'ईद-ए-मिलाद' गडहिंग्लज शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतील मक्का-मदिनाची आकर्षक प्रतिकृती नागरिकांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.



स्थानिक सुन्नी जुम्मा मशिदीपासून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. तेथून दसरा चौक, लक्ष्मी रोड, नेहरू रोड, छत्रपती शिवाजी चौक, मुल्ला मस्जिद, हुजरे गल्ली, बाजारपेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलपर्यंत पैगंबर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मक्का-मदिनाची प्रतिकृती साकारण्यात आली होती.



पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते या मिरवणुकीचे उद्घाटन झाले. जगात सर्वत्र शांतता, सुख-समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदावे, यासाठी मौलाना मेहमूद रजा यांनी सामूहिक प्रार्थना (दुआ) केली.



या प्रसंगी प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे, नगरसेविका बीनादेवी कुराडे, नगरसेवक संतोष चिक्कोडे आणि पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.



हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंजूरभाई मकानदार, ताहीर कोचरगी, इर्शाद मकानदार, राजू जमादार, अल्ताफ शानेदिवाण, गौस मकानदार, परवेज शेख, फिरोज मकानदार, रफिक पटेल, नूर अत्तार, आशपाक मकानदार, युनूस नाईकवाडे, एम. एस. बोजगर यांच्यासह 'दादा जे. एम. ग्रुप'च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.