महागावच्या महात्मा फुले विद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी जीवन हा आयुष्याचा पाया असतो. या काळात केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, सहकार्य आणि वेळेचे नियोजन यांसारखे मूलभूत गुण आत्मसात करावेत. मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य व मर्यादित वापर करून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असा मोलाचा सल्ला प्राचार्य पी.डी. पाटील यांनी दिला.
येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील यांचा प्राचार्य पी.डी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले, यश मिळवण्यासाठी परिस्थितीपेक्षा स्वतःची जिद्द आणि आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण असतात, ते ओळखून त्यांचा योग्य विकास केला पाहिजे. अपयशाने खचून न जाता निरंतर प्रयत्न करत शिक्षकांचा आदर व पालकांचे मार्गदर्शन घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे. यावेळी रशिदा खलिफ, निलाक्षी पारदे, पूजा रजपूत, प्रकाश चौगुले आणि प्रा. संजय मर्णहोळकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
या सोहळ्याला प्रा. मुकुंद मांडरे, प्रा. भिमराव मनगुत्ते, रमेश कळविकट्ठे, किरण पाटील, शिवानी कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रृती बेळेरी हिने केले. सूत्रसंचालन प्रांजल थोरात व तृप्ती पोवार यांनी कुशलतेने सांभाळले तर आभार श्रेया वासुगावडे यांनी मानले.


