Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'टिमवर्क'ची ताकद वैयक्तीकपेक्षा सरस : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज युनायटेडतर्फे फुटबॉलपटूंचा गौरव


गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेडच्या यशस्वी फुटबॉलपटूंचा गौरव करताना मंत्री हसन मुश्रीफ. सोबत सतिश पाटील, शर्वण्णा धर्मन, महेश सलवादे, अंजना रेडेकर आदी. ( आशपाक किल्लेदार ) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी ):  विश्वकरडंक फुटबॉल स्पर्धेत अवघे जग मेस्सी आणि एम्बापेच्या चर्चेत गुंग होते. पण, स्पेनने अनपेक्षितपणे मुसंडी मारीत बाजी मारली. हे केवळ स्पेनमधील खेळाडूंच्या अफलातून सांघिक खेळाच्या ( टिमवर्क) जादूने इतिहास घडविला. त्यामुळे 'टिमवर्क'ची ताकद हि वैयक्तीक क्षमतेपेक्षा अधिक सरस ठरल्याचे प्रतिपादन वैद्यकीय  शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.  ते येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आयोजित फुटबॉलपटूंच्या गौरव समारंभात बोलत होते. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.



गडहिंग्लज युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी स्वागत करून गत हंगामातील कामगिरीची आढावा घेतला. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी गेल्या पंचवीस वर्षात संस्थेने राबविलेल्या उपक्रमामुळे फुटबॉलचा चांगला माहौल झाला असून अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी इमारतीची गरज प्रास्ताविकात मांडली. यावेळी सौरभ पाटील, गौस मकानदार, प्रसन्न प्रसादी, सुरज कोंडूस्कर, सागर पोवार, धीरज कुरबेट्टी, श्रीराज सरदेसाई यांच्यासह तामीळनाडू, मिरज, बेळगाव, सांगली येथील स्पर्धेतील विजेत्या संघातील ६८ फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.



मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या फुटबॉलने क्रीडा क्षेत्रात वेगळेपण जपले आहे. अगदी लहान वयात विद्यार्थ्यांना लागलेली फुटबॉलची गोडी आशादायक आहे. या खेळाडूंच्या विकासासाठी लागेल ती मदत करण्याचे धोरण कायम राहिल. 

गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर म्हणाल्या, गडहिंग्लजचे फुटबॉल प्रेम लक्षात घेऊन केदारी रेडेकर फौंडेशनने वीस वर्षापर्वी  दिलेल्या मदतीतून युनायटेडने निर्माण केलेले फुटबॉलचे वातावरण समाधान देणारे आहे. 

प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे म्हणाले, नगराध्यक्ष चषक स्पर्धेतून क्रीडा क्षेत्राला पालिका प्रोत्साहन देणार आहे. यावेळी बंगळूरचे शर्वण्णा धर्मन,  युनायटेडचे संचालक जगदिश पट्टणशेट्टी, अरविंद बारदेस्कर, महादेव पाटील, मतीन इनामदार, एन. बी. अरळी यांच्यासह पालक, माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.


गडहिंग्लजचे 'टँलेन्ट; अव्वल

गडहिंग्लज युनायटेडचा प्रतिभावान खेळाडू अभिषेक पोवारने बंगळूच्या किक स्टार्टकडून सलग दोन हंगामात सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम  केला.  सर्वात स्पर्धात्मक मानल्या जाणा-या बंगळूर लीगमध्ये देशभरातील अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामुळे केरळ, गोवा, कोलकत्ता, मणिपूरच्या खेळाडूंना मागे टाकून अभिषेकने संतोष ट्रॉफीतही कर्नाटकाला विजेतेपद मिळवून दिले. शिस्तबध्द, मेहनती असणा-या अभिषेकमुळे गडहिंग्लजच्या फुटबॉल 'टँलेन्ट'चे देशभर कौतुक झाले. त्यामुळे अश्या स्थानिक खेळाडूंना करारबध्द करण्यासाठी आपला संघ उत्सुक असल्याचे बंगळूरच्या किक स्टार्ट एफसीचे  सीईओ शर्वण्णा धर्मन यांनी भाषणात सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.