Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या हाती येणार हिशोबाची 'मास्तरी' ; बुगडीकट्टीच्या 'मानवता फाउंडेशन'चा अनोखा उपक्रम

तेरणी गावातून विनामूल्य 'पासबुक' वाटप अभियानाचा यशस्वी प्रारंभ 


पूर्व भागातील तब्बल ३० हजार शेतकऱ्यांना होणार थेट फायदा




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शेतकरी बांधवांना त्यांच्या संस्थेकडील व बँकेकडील कर्जाची अचूक रक्कम, शेअर्स, व्याज आणि शिल्लक बाकीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळावी, तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता यावी, या उदात्त हेतूने बुगडीकट्टी येथील 'मानवता फाउंडेशन'तर्फे विकास सेवा संस्थेच्या सभासदांसाठी विनामूल्य पासबुक वितरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कौतुकास्पद अभियानाचा प्रारंभ तेरणी गावातून करण्यात आला.


या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत गडहिंग्लज परिसराच्या पूर्व भागातील सुमारे ३० हजार शेतकरी बांधवांना मोफत पासबुक दिले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात तेरणी येथील विकास सेवा संस्थेच्या सभासदांसाठी ६०० पासबुकांचे वितरण करण्यात येणार असून, यासंदर्भात उपस्थितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी तेरणी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश फगरे, 'आध्या ऑनलाइन सेंटर'चे संचालक करवीर नंद्यापगोळ, 'आपले सरकार सेवा केंद्र'चे संचालक रियाज जमादार आणि माजी सैनिक सुनील तोडकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात पासबुक देऊन अभियानाचा नारळ वाढवण्यात आला.


यावेळी मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष तथा निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण सुबराव केसरकर, भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी गंगाराम शिवाजी आंबुलकर, फाउंडेशनचे सचिव निंगाप्पा देसाई, तानाजी गोरे, मंजुनाथ देसाई व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी करवीर नंद्यापगोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 'मानवता'चे पासबुक ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान!

हा उपक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची अचूक माहिती मिळविण्यास, आर्थिक नियोजन करण्यास आणि सहकार क्षेत्रातील संस्थांवरील विश्वास अधिक दृढ करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.

 — उपस्थित मान्यवर



पासबुकचे मुख्य फायदे व वैशिष्ट्ये:


एकाच ठिकाणी सर्व माहिती: कर्जाची रक्कम, शेअर्सची माहिती, व्याज, बाकी रक्कम आणि संस्था व बँकेशी संबंधित सर्व व्यवहारांची नोंद एकाच ठिकाणी उपलब्ध.

 

आर्थिक पारदर्शकता: प्रत्येक व्यवहाराची अचूक नोंद राहणार असल्याने संस्था आणि शेतकरी यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता येईल.

 

आर्थिक नियोजन सोपे: परतफेडीची अचूक तारीख व रक्कम स्पष्ट दिसणार असल्याने शेतकऱ्यांना स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सहज शक्य होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.