आजरा (हसन तकीलदार): स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव केवळ औपचारिक ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकी व ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाची जोड देणारा आदर्श उपक्रम श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने राबवला आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात ज्येष्ठ सभासद संगम गुंजाटी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण पार पडले.
स्वःता ध्वजारोहण न करता समाजातील ज्येष्ठ सभासद, प्रतिष्ठित व्यक्ती किंवा सामाजिक योगदान देणाऱ्या घटकांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्याची एक वेगळी अन् कौतुकास्पद परंपरा संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने ज्येष्ठांचा व समाजोपयोगी व्यक्तींचा यथोचित गौरव होत असून परिसरात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता केली. सहकार क्षेत्रात केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक जाणिवा जपण्याचा संदेश श्री रवळनाथ पतसंस्थेने या उपक्रमातून दिला आहे.
उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य व उद्देश
स्वतः चेअरमन ध्वजारोहण न करता संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना ध्वजारोहणाचा मान देणे, समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणे, सहकार क्षेत्रासोबतच राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून समाजात देशभक्ती व एकतेची भावना दृढ करणे हा या पाठीमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ्यास संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी, व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, संचालक मजीद मुराद, युसूफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहिम इचनाळकर, विलास कुंभार, सुधीर नार्वेकर, सुरेखा फडके, रमेश कारेकर, दिवाकर नलवडे, सदानंद नार्वेकर, अशोक पोवार, राजू परीट, देगा डिसोजा, मलिकार्जुन तेरणी, हुसेन दरवाजकर यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

