शितल चिगरी जी.एस., तर अंजली माने एल.आर.पदी विजयी!
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रावसाहेबआण्णा कित्तूरकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या सरचिटणीस (जी.एस.) आणि लेडीज प्रतिनिधी (एल.आर.) या अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी पार पडलेली जिमखाना निवडणूक अत्यंत चुरशीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीअंती जी.एस. पदी कु. शितल संजय चिगरी तर एल.आर. पदी कु. अंजली अनिल माने यांनी बाजी मारली. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. मतमोजणी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.
या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित जी.एस. शितल चिगरी व एल.आर. अंजली माने यांचा महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य उमेश सावंत, उपप्राचार्य व्ही. पी. पन्हाळे, आर्ट्स व कॉमर्स विभागप्रमुख प्रा. स्वाती क्षीरसागर, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा. गुरुलिंग खंदारे, इंग्रजी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. इजाज आजरेकर, प्रा. पी. बी. रक्ताडे, प्रा. तृप्ती हंजी, प्रा. सुभाष तिप्पे यांच्यासह समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. विशाल चांदणे यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी प्रतिनिधी हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणारा मुख्य दुवा असतात. नवनिर्वाचित प्रतिनिधींनी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या मनोगतात विजयी उमेदवार शितल चिगरी व अंजली माने यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान प्रक्रिया आणि जबाबदार नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. दयानंद ग्वाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

