Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

व्हळेहिटणीच्या माजी सरपंचांच्या सुपुत्राची अमानुष हत्या

तवंदीच्या विहिरीजवळ सापडला रक्ताळलेला मृतदेह ; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ




गडहिंग्लज (प्रतिनिधी): पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी गावच्या वळणावर बुधवारी सकाळी एक अतिशय थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. गडहिंग्लज साखर कारखान्यातील कामगार आणि बसवेश्वर सेवा संस्थेचे संचालक महंमद शमशेर खलीफ (वय ५२, रा. व्हळेहिटणी, ता. गडहिंग्लज) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून अत्यंत अमानुषपणे खून केल्याचे समोर आले आहे. एकीकडे संपूर्ण परिसरात ईद-ए -मिलादचा उत्साह असतानाच भल्या पहाटे या क्रूर हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि निपाणी व गडहिंग्लज तालुका सुन्न झाला.


तवंदी येथील गावच्या वळणावरील विहिरीजवळ एका पुरुषाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. हे भयानक दृश्य पाहताच ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने निपाणी ग्रामीण पोलिसांना याची खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार आणि पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.


तपासाची चक्रे वेगाने, खुनाचे गूढ कायम


पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात रवाना केला. तपासादरम्यान हा मृतदेह व्हळेहिटणी येथील प्रतिष्ठित नागरिक महंमद खलीफ यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत खलीफ हे व्हळेहिटणी गावातील माजी सरपंचांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. ईदच्याच पवित्र दिवशी कुटुंबातील मुख्य कर्त्या पुरुषाची अशी निघृण हत्या झाल्याने खलीफ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे अन्य काही गंभीर कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.