कोकरेचे ग्राम महसूल अधिकारी संजय राठोड यांचा 'उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी' म्हणून गौरव
गडहिंग्लज (अमर डोमणे ) : भारतीय सैन्यदलात सलग १८ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर महसूल क्षेत्रात दाखल झालेल्या संजय राठोड यांनी आपल्या उत्कृष्ट आणि तत्पर सेवेचा ठसा उमटवला आहे. कोकरे (ता. चंदगड) येथील ग्राम महसूल अधिकारी संजय राठोड यांच्या २०२५-२६ या महसुली वर्षातील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी त्यांची 'उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी' म्हणून निवड केली आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष समारंभात माजी मंत्री भरमूआण्णा पाटील व चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संजय राठोड यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरीक्षक चौखंडे, नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार, मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संजय राठोड २०२० मध्ये कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात गडहिंग्लज तहसील कार्यालयाअंतर्गत कुमरी येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर चंदगड तालुक्यातील कोकरे सजा आणि अतिरिक्त कार्यभार असलेल्या शिरगाव सजा येथे कार्यरत असताना त्यांनी प्रशासकीय कामात मोठी तत्परता दाखवली. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'जिवंत ७/१२ टप्पा २' मधील सर्व कामे वेळेत पूर्ण केली. याशिवाय शासन निर्णयानुसार 'हरे सरंजाम वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर' करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी यशस्वीरीत्या फत्ते केले.
लष्करी शिस्त अन् लोकसेवेचा ध्यास!
संजय राठोड यांनी महसूल सेवेत येण्यापूर्वी भारतीय सैन्यदलात १८ वर्षे कर्तव्य बजावून देशाचे रक्षण केले आहे. निवृत्तीनंतर विश्रांती न घेता त्यांनी २०२० च्या कोरोना संकटात महसूल सेवेचे आव्हान स्वीकारले. सैन्यातील कडक शिस्त आणि लोकसेवेची निष्ठा यांच्या बळावर त्यांनी महसूल प्रशासनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

