Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्कोडा सर्व्हिस सेंटरच्या नावाने गडहिंग्लजमधील सराफाला ५ लाखांचा गंडा; बनावट लिंकद्वारे बँक खाते साफ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): नॅशनल कन्झ्युमर फोरममध्ये तक्रार दाखल करण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने गडहिंग्लज येथील प्रसिद्ध सराफाला तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 'स्कोडा सर्व्हिस सेंटर'मधून बोलत असल्याचे सांगत व्हॉट्सॲप कॉलद्वारे विश्वास संपादन केला आणि मोबाईलवर एक लिंक पाठवून बँक खात्यातून रक्कम परस्पर लांबवली. याप्रकरणी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात अनोळखी सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आयोध्या नगर शुभ संगम कॉलनी,  येथील रहिवासी व व्यावसायिक अमर संगाप्पा दड्डी (वय ५०) हे २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.५० च्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञाताचा व्हॉट्सॲप कॉल आला. समोरील व्यक्तीने 'स्कोडा सर्व्हिस सेंटर'मधून बोलत असल्याची बतावणी केली.


'पाच रुपयां'च्या लिंकने ५ लाख गायब 


संशयिताने दड्डी यांचा विश्वास संपादन करून 'नॅशनल कन्झ्युमर फोरम'कडे तक्रार नोंदवण्यासाठी केवळ ५ रुपये शुल्क भरावे लागेल असे सांगितले. त्यासाठी दड्डी यांच्या व्हॉट्सॲपवर एक बनावट लिंक पाठवली. दड्डी यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जशी ती लिंक उघडली तसा भामट्याने त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवला.


त्यानंतर दड्डी यांच्या नकळत युनियन बँक ऑफ इंडिया (गडहिंग्लज शाखा) येथील त्यांच्या करंट अकाउंटमधून टप्प्याटप्प्याने ५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवून घेण्यात आले. खात्यातून भलीमोठी रक्कम गायब झाल्याचा संदेश मिळताच दड्डी यांना धक्का बसला. आपली सायबर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी तात्काळ गडहिंग्लज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांच्या मदतीने संबंधित मोबाईल क्रमांक व बँक खात्यांचा मागोवा घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.