गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारी जगताची नाकाबंदी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडहिंग्लज पोलिसांनी गुन्हेगारी जगताची चांगलीच नाकाबंदी केली आहे. सण-उत्सवाच्या काळात विघ्न घडवणाऱ्या समाजकंटकांना थेट इशारा देत पोलिसांनी तब्बल ६५ अट्टल आरोपींची पोलीस ठाण्यात परेड घडवून आणली. तसेच ९ जणांवर तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा कडक बडगा उभारल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
पोलीस ठाण्यात भरली गुन्हेगारांची ‘शाळा’
काल सकाळी ११ वाजता गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तालुक्यातील प्रोव्हिजन, जुगार, मटका, एनडीपीएस (मादक पदार्थ), बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आणि पीटा अॅक्टखालील ६५ सराईत गुन्हेगारांना पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी स्वतः या सर्वांची झाडाझडती घेत, गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा भंग झाल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड दम भरला.
कारवाईचा धडाका: १० जण आधीच हद्दपार
उत्सवाच्या काळात शांतता भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी विविध कायदेशीर कलमांनुसार कारवाईचा सपाटा लावला आहे. ७० जणांवर कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
उत्सव कालावधीसाठी तडीपारी
बी.एन.एस.एस. कायदा २०२३ च्या कलम १६३ [२] नुसार ०९ गुन्हेगारांना गणेशोत्सवाच्या कालावधीपुरते हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई दारूबंदी अधिनियमाच्या कलम ९३ नुसार ३० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
वर्षभराची तडीपारी
यापूर्वीच गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. शांततेत आणि उत्साहात सण साजरा करण्याचे आवाहन करत, विघ्न संतोषींवर पोलीस प्रशासनाची बारीक नजर असेल असा स्पष्ट इशारा गडहिंग्लज पोलिसांनी दिला आहे.

