गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार
सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
गडहिंग्लज (अमर डोमणे ): मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला गडहिंग्लज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी यशवंत बाजार येथे सकल मराठा समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. श्री शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता गडहिंग्लजचे प्रांताधिकारी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीत कुणबी नोंदींबाबत सरकारने कोणताही पक्षपात न करता 'सरसकट कुणबी प्रमाणपत्र' देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच ऐतिहासिक सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी आणि जात पडताळणी समितीच्या संदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला सकल मराठा समाजाने पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता गडहिंग्लजचे प्रांताधिकारी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी या निवेदनाच्या वेळी गडहिंग्लज तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, अ. भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. यशवंत कोले, प्रतापराव सरदेसाई, जगदीश देवार्डे, प्रकाशराव तेलवेकर, शिवाजी कुराडे आणि युवराज बरगे यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

