तेरणी येथे लिंगायत समाजातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थी हा पालक आणि शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करणारा असावा. आजच्या डिजिटल युगात शिक्षण हाच माणसाचा तिसरा डोळा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा दुरुपयोग टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच मुलांच्या योग्य जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे, असे प्रतिपादन शिवराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष माने यांनी केले.
तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे लिंगायत समाजाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत व यशस्वी व्यक्तींचा सत्कार समारंभ आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. माने बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य स्वप्निल इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवलेल्या मल्लिकार्जुन यादगुडी, अपय्या हिरेमठ, करवीर गोरे, सौ. ज्योती नंद्यापगोळ, मोसीन मुल्ला, सोहेल अंकली, स्वप्निल इंगवले, स्वप्निल पाटील, विनायक नरेवाडी, उदय हिरेमठ, काडाप्पा मलकानावर, करवीर नावलगी आणि सचिन खणदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींनी उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम्ही आज ज्या पदावर किंवा स्तरावर पोहोचलो आहोत त्या प्रवासात आणि आमच्या जडणघडणीत आई-वडिलांचा वाटा सिंहाचा आहे," असे मनोगत सत्कारमूर्तींनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करवीर नंद्यापगोळ यांनी केले. सूत्रसंचालन ए. आय. नरेवाडी यांनी उत्कृष्टपणे सांभाळले तर उपस्थितांचे आभार एस. आय. कांबळे यांनी मानले. या सोहळ्यास लिंगायत समाजातील बांधव, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




