Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात जवाहर नागरी पतसंस्थेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात; जिल्हास्तरीय विस्तार व ३३.५ लाख नफ्याची घोषणा!

यशवंत गुणवंतांचा विशेष नागरी सत्कार


सभासदांच्या सहकार्यामुळेच प्रगतीचा आलेख उंचावला - चेअरमन इकबाल शेख




आजरा (हसन तकीलदार): येथील नामांकित 'जवाहर नागरी सहकारी पतसंस्थेची' ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुलेमानशेठ दीडबाग सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेने चालू अहवाल सालात ३३ लाख ५० हजार ९३० रुपयांचा घसघशीत नफा झाला असून संस्था आता जिल्हा पातळीवर विस्तारासाठी सज्ज झाली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इकबाल शेख होते.


सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेले सभासद, त्यांचे नातेवाईक, भारतीय सेनेतील वीर जवान, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व नैसर्गिक आपत्तीतील बळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


संस्थेचा जिल्हा पातळीवर विस्तार होणार: संचालक समीर चांद


स्वागत व प्रास्ताविक करताना संचालक समीर चांद यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. लवकरच आपली संस्था संपूर्ण जिल्हा पातळीवर कार्य करणार असून, यासाठी व्यवस्थापक बशीर काकतिकर व टीम विशेष प्रयत्न करत आहे. सभासदांच्या निरंतर सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती शक्य झाली आहे, असे संचालक समीर चांद यांनी आवर्जून नमूद केले.


यावेळी संचालक हाफिज भडगावकर यांनी अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. संस्थेला मागील वर्षापेक्षा ५ लाख २ हजार ५१७ रुपये अधिक नफा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. उपस्थितांनी ताळेबंदासह संस्थेच्या जिल्हा कार्यक्षेत्र वाढीच्या ठरावाला एकमुखाने मंजुरी दिली.


यशवंत गुणवंतांचा यथोचित गौरव


सभेत विविध क्षेत्रांत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंतांचा ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये नवनिर्वाचित औषध निर्माण अधिकारी सलमान शौकत दीडबाग (सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात निवड झाल्याबद्दल), गुणवंत विद्यार्थी सफवान अबूतालिब इप्पेरी (बी. एस्सी. ॲनिमेशनमध्ये शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल), सुवर्णपदक विजेती क्रीडापटू सुहाना इकबाल हिंग्लजकर (मथुरा, उत्तर प्रदेश येथील नॅशनल गेम्समध्ये 'सांघिक कबड्डीत' सुवर्णपदक पटकावल्याबद्दल) यांचा समावेश आहे.


सभेत ज्येष्ठ सभासद  कैयुम बुड्डेखान यांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी केली. तर ज्येष्ठ सभासद देवीदास पाचवडेकर यांनी संस्थेसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्याची आणि लाभांशात वाढ करण्याची मागणी केली. तसेच, संस्थेच्या हितासाठी थकबाकी वसुलीस सर्वोच्च प्राधान्य देण्याची मोलाची सूचना त्यांनी मांडली. सभेची सांगता संचालक इस्माईल बेपारी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या सभेला व्हाईस चेअरमन सौ. रुखसाना नसरदी, संचालक आसिफ सोनेखान, संचालक तौफिक आगा, संचालक इलियास तकीलदार, संचालक आसिफ दरवाजकर, संचालक असलम लमतुरे, संचालिका सौ. शबनम मुल्ला यांच्यासह संस्थेचे सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.