पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विवेकानंद शिक्षण संस्थेत निवड
शिवराज महाविद्यालयातर्फे सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालय व संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय, गडहिंग्लजचे माजी राष्ट्रीय कराटेपटू तसेच NCC ज्युनिअर अंडर ऑफिसर सुविदास हजारे यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विवेकानंद शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल शिवराज महाविद्यालयातर्फे सुविदास हजारे व त्यांच्या वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संचालक प्रा. विश्वजीत कुराडे, संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. एम. कदम यांच्या हस्ते सुविदास हजारे व त्यांच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.
सुविदास हजारे यांनी शिवराज महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कराटे क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर NCC मध्ये ज्युनिअर अंडर ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत शिस्त, नेतृत्व, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. क्रीडा मैदानावर केलेली मेहनत, NCC मधून मिळालेले संस्कार आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्यानंतर त्याच क्रीडा क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्य करण्याची संधी मिळणे ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची उपलब्धी आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिवराज महाविद्यालयाच्या क्रीडा व NCC विभागाच्या कार्याची परंपरा पुढे सुरू राहणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
शिवराज महाविद्यालयामध्ये क्रीडा व NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन व नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या परंपरेतील विद्यार्थी आता क्रीडा शिक्षक म्हणून भावी खेळाडू घडविण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याने महाविद्यालय परिवाराने आनंद व्यक्त केला.
यावेळी पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, NCC ऑफिसर व शारीरिक शिक्षण संचालक मेजर डॉ. राहुल मगदूम आणि क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत पाटील उपस्थित होते.
सुविदास हजारे यांच्या निवडीबद्दल महाविद्यालय परिवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडूपासून क्रीडा शिक्षकापर्यंतचा त्यांचा प्रवास ग्रामीण भागातील असंख्य होतकरू खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

