Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉल्बीच्या गदारोळाला फाटा देत तेरणीत टाळ-मृदंगाचा गजर; 'श्री करनाईक तरुण मंडळा'चा भक्तीमय उपक्रम आदर्शवत!

मृदंग वाजवणाऱ्या गणेशमूर्तीची केली होती प्रतिष्ठापना


आगमन अन् विसर्जन मिरवणूक भजनाच्या तालावर रंगली




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील 'श्री करनाईक तरुण मंडळाने' समाजासमोर एक अनोखा आणि आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. डॉल्बीसारख्या अनिष्ट व आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्रथेला पूर्णपणे फाटा देत या मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत पारंपरिक, भक्तिमय आणि टाळ-मृदंगाच्या निनादात साजरा केला. आगमन आणि विसर्जन या दोन्ही मिरवणुका भजनाच्या तालासुरात काढून मंडळाने गडहिंग्लज तालुक्यात एक नवा पायंडा पाडला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



मृदंगधारी बाप्पाची आकर्षक मूर्ती



यंदाच्या वर्षी श्री करनाईक तरुण मंडळाने एक अत्यंत संकल्पनात्मक आणि भक्तिमय अशी गणेशमूर्ती स्थापन केली होती. साक्षात 'गणपती बाप्पा मृदंग वाजवत आहेत' अशा स्वरूपातील सहा फुटी सुबक आणि मनमोहक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या या रुपाला साजेसा असाच उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राबवण्याचा निश्चय केला होता.


आगमन ते विसर्जन... केवळ भक्तीचा गजर!


गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हातात टाळ आणि मृदंग घेऊन भजनाच्या निनादात बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. डीजेच्या गाण्यांऐवजी विठुरायाच्या आणि गणरायाच्या भजनांनी परिसर दुमदुमून गेला होता.



त्यानंतर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीही हाच भक्तिभाव पाहायला मिळाला. शुक्रवारी पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीत सर्व वयोगटातील कार्यकर्ते, महिला आणि बालकांनी भजनाच्या तालावर ठेका धरला. विठूमाऊलीच्या भक्तीत तल्लीन होऊन, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या निनादात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.


या उपक्रमामुळे ठरले 'आदर्शवत' मंडळ'


सध्या गणेशोत्सवात लाखो रुपये खर्च करून डॉल्बी लावले जातात, ज्यामुळे लहान मुले, वृद्ध व रुग्णांना नाहक त्रास होतो. या पार्श्वभूमीवर तेरणीच्या श्री करनाईक तरुण मंडळाने दाखवलेली सामाजिक प्रगल्भता आणि संस्कृतीचे जतन करण्याचा घेतलेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे.  डीजेच्या कर्णकर्कश गोंधळाशिवाय उत्सव कसा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात साजरा करता येतो, हेच या मंडळाने सिद्ध करून दाखवले आहे. या भक्तिमय उपक्रमामुळे केवळ तेरणी गावातच नव्हे तर संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यात श्री करनाईक तरुण मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.