कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून केलेल्या कारवाईने खळबळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'जिंदाल' या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट पत्र्यांची उघडपणे विक्री करणाऱ्या गडहिंग्लज शहरातील दोन नामांकित दुकानांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत बनावट पत्रे आणि वाहतुकीसाठी वापरलेली गाडी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल दिनकर पाटील (रा. शाहू मिल कॉलनी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीस ठाण्यात कॉपीराईट (प्रतिलिपी अधिकार) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडहिंग्लज शहरातील संकेश्वर रोड येथील 'भवानी स्टील ट्रेडर्स' आणि भडगाव रोड येथील 'नाकोडा ट्रेडर्स' या दुकानांमध्ये नामांकित 'जिंदाल' कंपनीच्या ब्रँडचे बनावट पत्रे स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीस ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४५ ते ७.४० वाजेच्या दरम्यान या दोन्ही दुकानांवर धाड टाकली. यामध्ये भवानी स्टील ट्रेडर्स, संकेश्वर रोड येथे २,०१,४०० रुपये किमतीचे 'जिंदाल सबरंग' असे लिहिलेले २० फुटाचे ८० बनावट पत्रे, २,७०,००० रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची 'बडा दोस्त' गाडी, तर नाकोडा ट्रेडर्स भडगाव रोड येथे ३३,६०० रुपये किमतीचे 'जिंदाल सबरंग' असे लिहिलेले २० फुटाचे १४ बनावट पत्रे, २४,००० रुपये किमतीचे 'जिंदाल भारत कलर ओन प्लस' असे लिहिलेले २० फुटाचे १० बनावट पत्रे, १४,४०० रुपये किमतीचे 'जिंदाल रंगीन' असे लिहिलेले ८ फुटाचे १५ बनावट पत्रे असे साहित्य आढळून आले. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहेत. दरम्यान, गडहिंग्लजमधील नामांकित दुकानांमध्येच असा बनावट माल आढळल्याने व्यापारी वर्गात आणि ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

