संग्रहित छायाचित्र
गडहिंग्लज (संतोष नाईक): गडहिंग्लज शहरातील दोन नामांकित स्टील दुकानांवर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत, नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट (डुप्लिकेट) पत्रे विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बातमी समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
घर किंवा शेतातील शेड बांधताना नागरिक अधिक पैसे खर्च करून नामांकित ब्रँडचे पत्रे खरेदी करतात. जेणेकरून बांधकामाला बळकटी मिळावी आणि ऊन-पावसापासून दीर्घकाळ संरक्षण व्हावे. मात्र, ग्राहकांच्या याच विश्वासाचा फायदा घेऊन काही व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी हलक्या दर्जाच्या पत्रे नामांकित कंपन्यांचे नाव वापरून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
नामांकित दुकानांवरच धाड; व्यापारी वर्गात खळबळ
हे कृत्य एखाद्या लहान किंवा गल्लीबोळातील दुकानात नाही, तर शहरातील दोन नामांकित स्टील दुकानांमध्ये चालले होते, ही बाब सर्वाधिक धक्कादायक आहे. कंपन्यांच्या अधिकृत तपासणी अधिकाऱ्यांना या गैरप्रकाराची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई केली. धाडीदरम्यान लाखो रुपयांचा बनावट साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
गडहिंग्लजमधील दुकानांमध्ये हे पत्रे कुठून पुरवले जात होते? हाही प्रश्न आता चर्चेत आला आहे. फक्त दोनच दुकानांवर कारवाई झाली असली, तरी ग्रामीण भागातील इतर लहान-मोठ्या दुकानांमध्येही असा माल पोहोचवला गेला आहे का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
यापूर्वी खरेदी केलेल्या ग्राहकांचे काय?
ज्या ग्राहकांनी गेल्या काही महिन्यांत याच दुकानांमधून जर महागडे पत्रे खरेदी केले असतील तर त्यांच्या फसवणुकीची भरपाई कशी होणार? हाही मुद्दा आता चर्चेत आला आहे. आता केवळ या दोन दुकानदारांवर कारवाई करून न थांबता, या बनावट मालाचा मुख्य पुरवठादार कोण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

