माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पैसे भरूनही वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार बसर्गे व येणेचवंडी येथील घरगुती गॅस ग्राहकांनी तहसीलदारांकडे केली आहे. संबंधित गॅस एजन्सीची चौकशी करून कारवाई करावी आणि ग्राहक दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बसर्गे, येणेचवंडी व परिसरातील ग्राहकांना बुकिंग व ऑनलाईन/कॅश पैसे भरूनही अनेक दिवस गॅस सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. "आज गाडी येणार, उद्या येणार" अशी आश्वासने एजन्सीकडून दिली जातात. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी, शेतकरी आणि ग्रामस्थांना आपली कामधंदे सोडून दिवस-दिवस गॅसच्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. एजन्सीच्या कार्यालयात किंवा फोनवर चौकशी केल्यास कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
शासनाने 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या माध्यमातून प्रत्येक घराला स्वच्छ इंधन मिळून महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी, हे स्वप्न पाहिले आहे. मात्र, या धिसाड कारभारामुळे गृहिणींना पुन्हा चुलीकडे वळावे लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. या विलंबामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गोरगरीब कुटुंबांचे अतोनात हाल होत आहेत.
त्यामुळे या वितरकाच्या कारभाराची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी. तसेच तालुक्यातील इतर सुरळीत सेवा देणाऱ्या एजन्सीकडे येथील ग्राहकांची कनेक्शन्स वर्ग करण्यात यावीत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा न काढल्यास संपूर्ण परिसरातील गावे बंद ठेवून उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य विरुपाक्ष घुळाणावर, आण्णाप्पा शिंदे, तानाजी कुराडे यांच्यासह मारुती कागीनकर, सदाशिव कुराडे, निलेश यादव, भैरू बिरंजे, युवराज कांबळे, आनंदा कुराडे, नामदेव जाधव, अरुण रेडेकर, शंकर रायापगोळ, रावसाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत.


