गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील निराधार, वृद्ध आणि गरजू घटकांना आर्थिक आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती कटिबद्ध आहे. नवनिर्वाचित समितीची बैठक अध्यक्ष बसवराज कंकणवाडी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालयात पार पडली. या बैठकीसह मागील बैठकीतील मिळून 'संजय गांधी निराधार योजना' आणि 'श्रावण बाळ योजना' अंतर्गत प्राप्त २४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला तहसीलदार ऋषिकेत शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी विलास पाटील, श्रीमती सारिका खोत उपस्थित होते.
नुकतीच गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी बसवराज कंकणवाडी (हिटणी) यांची तर सदस्यपदी सुभाष चोथे (भडगाव), अशोक पांडव (नेसरी), चंद्रशेखर पाटील (बसर्गे बु.), सौ. हेमांगी देसाई (अर्जुनवाडी), तानाजी रानगे (बेळगुंदी), हारुण सय्यद (गडहिंग्लज) आणि अनिरुद्ध गाडवी (गडहिंग्लज) यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्तीनंतर ३१ ऑगस्ट रोजी नूतन अध्यक्ष कंकणवाडी यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
२४९ प्रकरणांवर मंजुरीची मोहर
बैठकीमध्ये तालुक्यातील प्रलंबित प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्यात आली. २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ६२ तर श्रावण बाळ योजनेचे ५५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. तर ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे ६५ आणि श्रावण बाळ योजनेचे ६७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे दोन्ही बैठका मिळून संजय गांधी योजनेचे १२७ आणि श्रावण बाळ योजनेचे १२२ असे एकूण २४९ पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी समिती तत्परतेने काम करेल, असा विश्वास यावेळी नूतन अध्यक्षांनी व्यक्त केला. प्रकरणांना मंजुरी मिळाल्यामुळे तालुक्यातील शेकडो निराधारांना मोठा दिलासा मिळाला आहे.



