अप्पी पाटील युवा मंच व महागाव ग्रामपंचायतीचा पुढाकार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे श्रम वाचवणे आणि विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, या सामाजिक उद्देशातून महागाव येथे भव्य शेतकरी मेळावा व साहित्य वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१२) सकाळी १० वाजता येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकात हा सोहळा पार पडणार आहे.
महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन आणि स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने तसेच डॉ. युवराज येडूरे यांच्या विशेष प्रयत्नातून 'अप्पी पाटील युवा मंच' व ग्रामपंचायत महागावच्या पुढकारांनी हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना तीन हजार मोफत कृषी फवारणी पंप, पॉवर वीडर आणि स्थानिक शाळांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे 'आर. ओ. प्लांट' मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ आप्पी पाटील असणार आहेत. तर महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गडकरी-भोसले,समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आय. एस. पाटील,उद्योजक आप्पासाहेब पोवार, गोडसाखरचे संचालक सोमनाथ पाटील,संस्था प्रतिनिधी दत्तराज पाटील,प्राचार्य पी डी पाटील,मनसे मुंबई माथाडी संघटनेचे चिटणीस प्रकाश पाटील,भुदरगड मनसे तालुका अध्यक्ष राहूल पाटील,महागावचे सरपंच प्रशांत शिंदे उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध मान्यवरांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
सामाजिक उत्तरदायित्वातून ग्रामीण भागाचा विकास
कंपन्यांच्या 'सीएसआर' निधीचा थेट ग्रामीण भागातील घटकांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. शेती कामासाठी आधुनिक फवारणी पंप व पॉवर वीडर मिळाल्याने शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट वाचण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच शाळांना आर.ओ. प्लांट दिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.या सर्वसमावेशक व बहुउद्देशीय शेतकरी मेळाव्यास महागाव परिसरासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील व महागाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

