कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता वेग आला असून आता हाती आलेल्या कलांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. राखीव गटातील पाचपैकी चार जागांवर समविचारी आघाडीने आपली पकड मजबूत केली आहे.
अतिशय चुरशीच्या ठरलेल्या ओबीसी गटाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर पडले आहेत, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी भक्कम आघाडी घेतली आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
दुसरीकडे महिला गटाच्या मतमोजणीत शौमिका महाडिक आणि अंजना रेडेकर यांनी आघाडी घेतली असून, भाग्यश्री डोंगळे आणि अर्चना पाटील या पिछाडीवर पडल्या आहेत. तसेच, अनुसूचित जाती गटातून समविचारी आघाडीचे राजू बाबा आवळे आघाडीवर आहेत, तर महायुतीचे सुजित मिणचेकर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतमोजणीची ही प्रक्रिया जसजशी पुढे जात आहे तसतशी राजकीय वर्तुळातील उत्सुकता वाढली असून, निकालाच्या पुढील फेरीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

