कोल्हापूर: कोल्हापूरच्या बहुचर्चित गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून निवडणुकीत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट समोर आला आहे. हातात आलेल्या ताज्या कलानुसार महायुतीने आघाडी घेतली असून दिग्गजांच्या पराभवाच्या चर्चेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
महायुतीची मुसंडी
सर्वसाधारण गटातील एकूण जागांपैकी महायुती 14 जागांवर तर समविचारी आघाडी 6 जागांवर आघाडीवर आहे. महिला वर्गामध्ये दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून या ठिकाणी महायुती आणि समविचारी आघाडीने प्रत्येकी 1 जागा आपल्या नावावर केली आहे. विशेष म्हणजे महिला गटातून शौमिका महाडिक आणि अंजना रेडेकर या दोन्ही नेत्या आघाडीवर असून त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे.
दिग्गज नेते पिछाडीवर
या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे सर्वसाधारण गटातून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे तसेच माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे दोघेही पिछाडीवर आहेत. या दिग्गजांच्या पिछाडीवर जाण्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सर्वसाधारण आणि महिला गटातील एकूण 22 जागांपैकी 15 जागांवर महायुती आघाडीवर आहे, तर समविचारी आघाडी 7 जागांवर आगेकूच करत आहे. सध्या कोल्हापुरात मतमोजणीची प्रक्रिया अतिशय वेगात सुरू असून, आगामी फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिली आहे.

