समविचारी आघाडीला १३ जागा तर महायुतीचा १२ जागांवर निसटता पराभव
तीन माजी अध्यक्ष, तीन माजी संचालकांना पराभवाचा धक्का: नवीन ११ चेहऱ्यांना संधी
कोल्हापूर : विजयादशमीच्या अगदी पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तासंग्रामाचा निकाल समोर आला. यामध्ये आमदार सतेज पाटील यांच्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने' बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीने व चुरशीने झालेल्या या रणसंग्रामात समविचारी आघाडीने बहुमताचा १३ जागांचा टप्पा पार करत सत्तेचे 'सीमोल्लंघन' केले, तर विरोधी महायुतीचा अश्वमेध १२ जागांवरच रोखला गेल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. या निकालात माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, शौमिका महाडिक व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांसारख्या अनेक राजकीय धुरंधरांना पराभवाचा धक्का बसला आहे. या घवघवीत विजयानंतर आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रमणमळा परिसर आणि 'अजिंक्यतारा' कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला.
सुरुवातीला महायुतीची मुसंडी, नंतर 'समविचारी'चा दणदणीत कमबॅक!
गोकुळसाठी रविवारी तब्बल ९९.९६ टक्के ऐतिहासिक मतदान नोंदवले गेले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये ३५ टेबलांवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळी पावणे नऊच्या सुमारास मतपेट्या उघडल्यानंतर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सर्वसाधारण गटात महायुतीने १७ जागांवर मजबूत आघाडी घेतली होती. त्यावेळी समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले व अभिजीत तायशेटे हे तीनच उमेदवार पुढे होते. मात्र, दुसऱ्या फेरीनंतर चित्रात नाट्यमय बदल झाला. समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी एकेक करत मताधिक्य वाढवण्यास सुरुवात केली आणि विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
राखीव गटांत 'समविचारी'चा झाडून विजय
राखीव गटांमधील सर्व ५ जागांवर समविचारी आघाडीने पूर्ण वर्चस्व गाजवले. महिला राखीव गटात महायुतीच्या प्रमुख उमेदवार शौमिका महाडिक यांना पराभवाचा धक्का बसला; तर अंजना रेडेकर आणि भाग्यश्री डोंगळे यांनी दणदणीत विजय संपादन केला.
इतर मागास वर्ग गटात नवीद मुश्रीफ यांचा पराभव करत शशिकांत खोत विजयी झाले. अनुसूचित जातीगटात माजी आमदार राजू आवळे यांनी बाजी मारली. भटक्या-विमुक्त जमाती गटात बयाजी शेळके यांनी विजय मिळवला.
विश्वास पाटलांची फेरमतमोजणीची मागणी फेटाळली
निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पराभूत उमेदवार आणि माजी संचालक विश्वास पाटील तसेच युवराज पाटील यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी चौकशीअंती हा अर्ज फेटाळून लावला.
नवनिर्वाचित विजयी उमेदवारांची यादी
समविचारी आघाडीचे विजयी (१३ जागा )
सर्वसाधारण गट (८): शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजीत तायशेटे, विद्याधर गुरबे, किसन चौगले, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राहुल देसाई, बाबासाहेब चौगले.
राखीव गट (५): अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे (महिला), राजू आवळे (SC), शशिकांत खोत (OBC), बयाजी शेळके (NT).
महायुतीचे विजयी उमेदवार (१२ जागा)
सर्वसाधारण गट (१२): डॉ. चेतन नरके, वीरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, अंबरीश घाटगे, अजित नरके, राजेश पाटील, रणजीतसिंह पाटील, अजित पाटील, रणजित दि. पाटील, मदन देसाई, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड.





