Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक आणि प्रभावी पाठपुरावा सुरू

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक




मुंबई :  मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक आणि प्रभावी पाठपुरावा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नांची सोडवणूक मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत करण्यात येईल असा विश्वास मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.


मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ( गोदावरी आणि कृष्ण खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार प्रसाद लाड, व्यवस्थापकीय संचालक अविनाश रणखांब आणि सारथी चे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार खडके, संचालक उमाकांत दांगट, सामान्य प्रशासन (सा. वि. स.) विभागाचे अवर सचिव यांच्यासह नियोजन, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि विधि विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच मराठा उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



उपाययोजनांबाबत माहिती


यावेळी मराठा आरक्षण कक्ष, सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यात आली.


मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन झाल्यापासून उपसमितीच्या १३ बैठका, तसेच अध्यक्ष म्हणून १४ आढावा बैठका, अशा एकूण २७ बैठका झाल्या आहेत. मराठा समाजाशी संबंधित विविध प्रश्नांचा सातत्याने आढावा घेऊन शासन पातळीवर त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत आहे.


५२ लाखांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरीत


राज्यात आजपर्यंत ५२ लाखांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरीत झाली आहेत. मराठवाड्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २०२३ पासून ३ लाख २० हजार प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्गठित झाल्यापासून राज्यात ४ लाख २८ हजार, तर मराठवाड्यात ८१ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरीत झाली आहेत. न्यायमूर्ती शिंदे समितीस ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नव्याने कुणबी नोंदी शोधण्याचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.



कुणबी जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये २०२३ पासून राज्यात २ लाख ६० हजार प्रमाणपत्रे वैध ठरली असून केवळ २१९ अर्ज अवैध ठरले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास प्रवेशाच्या दिनांकापासून ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.



मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महायुती सरकारने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण आतापर्यंत न्यायालयीन लढाईत टिकविण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.




शासनाच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठे, माजी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, आशुतोष कुंभकोणी आणि वरिष्ठ विधिज्ञ ॲड. विजयसिंह देशमुख यांच्या माध्यमातून न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर या आरक्षणाचा फायदा होत असून आजपर्यंत ७ लाख ५७ हजार एसईबीसी जात प्रमाणपत्रे वितरीत झाली आहेत.


 


आंदोलनात बलिदान दिलेल्या ३०९ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये, याप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३० कोटी ९० लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. एस.टी. महामंडळामध्ये ३५ वारसांना नियुक्ती देण्यात आली असून एमआयडीसी मध्येही नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर वारसांची पडताळणी करून प्राधान्याने नियुक्ती देण्यासाठी उपसमितीमार्फत पाठपुरावा सुरू आहे.


हैद्राबाद गॅझेटीअर लागू करून कुणबी प्रमाणपत्रे वितरीत करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेचा उपसमितीमार्फत आढावा घेतला जात आहे. अर्जदारांना सहाय्य करण्यासाठी मराठवाड्यात जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.


 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहेत. याबाबत येत असणाऱ्या अडचणी प्राधान्याने दुर करण्यात येत आहेत.


 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील निर्वाह भत्त्यासाठी चालू आर्थिक वर्षात ४६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून संपूर्ण निधी वितरीत करण्यात आला आहे.


 

मराठा समाजाशी संबंधित कामकाजासाठी मराठा आरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने मंत्रालय स्तरावरील कामकाजाला अधिक गतिमानता आली आहे.


 मराठा आरक्षण कायदा २०१८ रद्द झाल्यामुळे शासकीय सेवेतून वंचित राहिलेल्या १,५५३ उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यात आली आहे. या उमेदवारांना सेवाजेष्ठता, पदोन्नती, निवृत्तीवेतन, अनुकंपा आदी सेवाविषयक लाभ देण्याची प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १ लाख ८१ हजार उद्योजक घडवले


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत २०१८ पासून आजपर्यंत १ लाख ८१ हजार उद्योजक घडविण्यात आले असून बँकांमार्फत १५,८९३ कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. महामंडळामार्फत मराठा समाजातील उद्योजकांना २,१६० कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.


 


यावर्षी मंजूर ७५० कोटी रुपयांपैकी ६०० कोटी रुपयांचा निधी महामंडळास शासनाकडून वर्ग करण्यात आला आहे. महामंडळाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबई येथे १.५ एकर भूखंड रुपये १ प्रति चौ.मी. या दराने देण्यात आला असून येथे बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे.




‘सारथी’च्या योजनांचा २.०१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ


सारथीमार्फत स्थापनेपासून मराठा समाजातील व्यक्तींना १,७७८ कोटी रुपयांचे लाभ देण्यात आले आहेत. सारथीच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घेऊन १,८७२ उमेदवारांची शासकीय सेवेत निवड झाली आहे.


सारथीमार्फत ८ ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात येत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन आहे. सारथीमार्फत विविध प्रकारच्या ५४ योजना राबविण्यात येत असून २०२५-२६ मध्ये ५७ हजार लाभार्थ्यांना ३५४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. बैठकीदरम्यान मराठा समाजाशी संबंधित विविध प्रश्न विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडले.


मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा सुरू असून यापुढेही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेऊन त्यांच्या प्रश्नांचा आढावा घेतला जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.