Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोकुळ निवडणुकीत चंदगड तालुक्याला धक्का: राजेश पाटील एकमेव विजयी, क्रॉस व्होटिंगची चर्चा रंगली



चंदगड: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या निकालात चंदगड तालुक्यात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. महायुतीकडून निवडणूक लढवणारे माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवत गोकुळच्या संचालकपदी धडक मारली आहे. मात्र, तालुक्यातून किमान दोन संचालक निवडून येतील ही अपेक्षा फोल ठरल्याने राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे.


या निवडणुकीत चंदगड तालुक्यातून राजेश पाटील, दीपकदादा पाटील आणि विशाल गोपाळराव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील आणि राजेश पाटील यांची राजकीय ताकद पाठीशी असतानाही महायुतीचे दीपकदादा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटाचे उमेदवार विशाल पाटील यांनाही अपयश आले. यामुळे तालुक्यात क्रॉस व्होटिंग झाल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.


मागील निवडणुकीत चंदगडला एकही संचालकपद मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा किमान दोन प्रतिनिधी मिळतील अशी आशा दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांना होती. परंतु, केवळ राजेश पाटील यांच्या रूपाने एकच संचालक मिळाल्याने राजकीय वर्तुळात निकालाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.


दरम्यान, राजेश पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा केला. आता आगामी काळात गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि चंदगड तालुक्याच्या विकासासाठी राजेश पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.