१८५७ साली स्थापन झालेल्या ऐतिहासिक शाळेच्या घटत्या पटसंख्येची गावाला लागली चिंता
माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत, पालक अन् व्यवस्थापन समिती एकाच छताखाली; शाळेसाठी घेतला मोठा निर्णय!
केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी मांडला विकासाचा आराखडा, गावाने दिला पूर्ण सहकार्याचा कौल
केंद्रशाळा पुन्हा गजबजविण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श 'हलकर्णी पॅटर्न'
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळातील गौरवशाली परंपरा लाभलेली 'हलकर्णी जीवन शिक्षण विद्यामंदिर' (केंद्रशाळा) टिकवण्यासाठी संपूर्ण हलकर्णी गाव एकवटले आहे. पटसंख्या घटल्याने अस्तित्वाचा संघर्ष करणाऱ्या या ऐतिहासिक शाळेचे वैभव पुन्हा परत मिळवून देण्यासाठी गावात इतिहासात पहिल्यांदाच केवळ 'शाळेच्या भवितव्यासाठी' विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. "पालकांनी फक्त मुलांना शाळेत पाठवावे; त्यांच्या गुणवत्तेची आणि सुविधांची जबाबदारी आमची!" असा ऐतिहासिक निर्धार करत ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शाळा वाचवण्यासाठी वज्रमूठ बांधली आहे.
गेल्या चार वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पटसंख्या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इंग्रजी माध्यमांचे आकर्षण आणि पटसंख्येतील घट ही केवळ शाळेचीच नव्हे तर संपूर्ण गावाच्या अस्मितेची आणि चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत संपूर्ण गाव एकाच छताखाली आले आणि शाळेचा कायापालट करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
हलकर्णी केंद्रशाळेला तालुक्यात 'आदर्श' बनवणार!
सभेत केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी व मुख्याध्यापिका वैशाली गुरव यांनी शाळेच्या विकासासाठी आणि आधुनिक सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामांची यादी उपस्थितांसमोर मांडली. ग्रामस्थांनी ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून या ऐतिहासिक केंद्रशाळेला संपूर्ण तालुक्यात 'रोल मॉडेल' (आदर्श शाळा) बनवण्याचा ध्यास घेतला आहे.
गावच्या जडणघडणीतील योगदानाला उजाळा
सभेच्या सुरुवातीला विलास भोगाने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सरपंच योगिता संगाज, राजेंद्र पाटील, राजू कवळीकट्टे, राजगोंडा पाटील, सादिक नगारसे, डॉ. प्रसन्ना चौगुले, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके व विजय मुंगुरवाडी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. १८५७ सालापासून या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडवून गावाला आणि गावाबाहेर नावलौकिक मिळवून दिला आहे. या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत उपस्थितांनी शाळेसाठी सर्वतोपरी योगदान देण्याची शपथ घेतली.
या विशेष सभेसाठी शिवकुमार संसुद्धी, अमरदीप व्हसकोटी, राजू वड्राळे, शिवाजी कुराडे, किरण संगाज, बापू वाजंत्री, रमेश पाटील यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



