मुगळी येथील सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
जरळी (वार्ताहर): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. अशा महान महात्म्याचे विचार आत्मसात करायचे असतील तर वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. महात्मा गांधींचे विचार खऱ्या अर्थाने वाचनातूनच मिळतात, असे प्रतिपादन मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील लोकनियुक्त सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी केले.
मुगळी येथील 'महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालया'त महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते.
पुढे बोलताना सरपंच आरबोळे म्हणाले की, मुगळी येथील वाचनालयाचे कामकाज महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरूनच चालते. वाचनालयातील शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि उत्तम विचारांचे ग्रंथ ही या वाचनालयाची वैशिष्ट्ये आहेत. मन मजबूत करण्याचे आणि विचारांना दिशा देण्याचे काम वाचनालय करते. शाळा आणि वाचनालये समाजाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावत असून, पुस्तके माणसाला संकटांशी लढण्याचे बळ देतात आणि विचार बदलण्याची ताकद निर्माण करतात. म्हणूनच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृती रुजवणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ ग्रामसेवक गुरु गुरव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. याप्रसंगी हर्षित महाडिक या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण केले.
यावेळी आप्पासाहेब जाधव, ईश्वर हुल्लोळी, निजगुणी स्वामी, सुरेश पाटील, विजय महाडिक, सौरभ स्वामी, के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी, आपासो कांबळे, राजेंद्र मांग, आयुष महाडिक यांच्यासह गावातील वाचक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आपासो जाधव यांनी केले तर आभार के. डी. धनवडे यांनी मानले.



