कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, निकालाचे लाईव्ह अपडेट्स समोर येत आहेत. या मतमोजणीदरम्यान करवीर, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातील 'क्रॉस व्होटिंग'च्या जोरदार चर्चांमुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणि ताणतणाव कमालीचा वाढला आहे.
मतपेटीत सापडली भावनिक चिठ्ठी
या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एका मतदान केंद्रावर अतिशय रंजक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतपेटीत चक्क एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये मतदाराने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्या चिठ्ठीवर लिहिलंय की, "तुमच्या पोरा बाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतपेटीत सापडलेल्या या चिठ्ठीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून सभासदांमधील भावनांचा उद्रेक या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
सध्या मतमोजणी प्रक्रिया वेगात सुरू असून कोणत्या पॅनेलचे पारडे जड ठरणार आणि 'क्रॉस व्होटिंग'चा फटका कोणाला बसणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

