Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव केंद्रशाळेच्या बालमावळ्यांनी सामानगड किल्ल्यावर अनुभवला शिवरायांचा इतिहास!

'इतिहास शिकूया किल्ल्यावर' उपक्रमातून ४ थीच्या विद्यार्थ्यांना थेट ऐतिहासिक स्थळावर 'अध्ययन अनुभूती' 


दुर्गवीर प्रतिष्ठानसोबत केली स्वच्छता मोहीम




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळी नेऊन संकल्पना समजून सांगितल्या तर इतिहास त्यांच्या मनावर कायमचा कोरला जातो. याच उद्देशाने रविवारी सुट्टीचे औचित्य साधून महागाव केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक 'सामानगड' किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आणि पराक्रमाचा थेट धडा गिरवला. शिक्षक अयाज बागवान यांच्या पुढाकारातून 'इतिहास शिकूया किल्ल्यावर' हा उपक्रम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबवण्यात आला.


डोंगरी किल्ले, टेहाळणी अन् ऐतिहासिक संकल्पनांचा उलगडा


या अभ्यासू मोहिमेदरम्यान शिवरायांनी स्वराज्यासाठी डोंगरी किल्ल्यांचीच निवड का केली? गडावरून परिसरातील भागावर टेहाळणी कशी केली जायची? 'माची' म्हणजे काय? तसेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, चोरखिंड आणि गडावरील तत्कालीन पाण्याची नियोजनबद्ध व्यवस्था या सर्व गोष्टी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष दाखवून सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. पुस्तकातील ऐतिहासिक शब्दांचे नेमके अर्थ आणि शिवकालीन योजनांची अनुभूती मिळाल्याने बालचमूचा उत्साह द्विगुणित झाला होता.



दुर्गवीर प्रतिष्ठानसोबत स्वच्छता मोहीम आणि 'सूर पारंब्या'चा आनंद


केवळ इतिहास अभ्यासण्यावरच न थांबता विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि पर्यावरण भानही जपले. गडाचे संवर्धन करणाऱ्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान'च्या टीमसोबत विद्यार्थ्यांनी सामानगड परिसरामध्ये उत्साहाने स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले. यानंतर शिवकालीन मैदानी खेळांची अनुभूती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वडाच्या झाडाखाली 'सूर पारंब्या' या पारंपरिक खेळाचा मनमुराद आनंद लुटला.



ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन आणि परिसर अभ्यास


या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी सामानगड येथील महादरवाजा, अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, झेंडा बुरुज, वेताळ बुरुज, चोरखिंड, सोंडी बुरुज, दारूचे कोठार, प्रसिद्ध साखर विहीर, सातकमान विहीर आणि अंधार कोठडी या ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. सोबतच प्राचीन हनुमान मंदिर व शिवलिंगाचे दर्शन घेऊन माहिती जाणून घेतली.



यावेळी शिक्षक अयाज बागवान यांनी परिसर अभ्यास विषयांतर्गत गडावरील विविध वनस्पतींचे प्रकार, वनस्पतींचे अवयव आणि पानांचे विविध प्रकार यांसारख्या निसर्ग घटकांचीही प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच त्यांच्यात गड-किल्ल्यांप्रती संवर्धनाची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.