गोरगरीब, सर्वसामान्यांच्या लेकरांच्या शाळा उध्वस्त करू नका- बाळेश नाईक
गडहिंग्लजमध्ये 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच' चा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कमी पटसंख्येचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, यासह इतर शैक्षणिक मागण्यांसाठी आज ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’च्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील जि. प. शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, पालक, शिक्षणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, 'गाव, वाडी, वस्ती तिथे शाळा' धोरण कायम ठेवून १ विद्यार्थी असला तरी शाळा सुरू ठेवावी, गुणवत्तेवर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जुलमी शासन निर्णय रद्द करावा, नवीन शैक्षणिक धोरण मागे घेऊन शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे, 'केजी टू पीजी' सर्वांना मोफत, समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्क्यांपर्यंत वाढवावा, शाळा बंद करून बहुजन व कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव सहन केला जाणार नाही. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
गोरगरीब, सर्वसामान्यांच्या लेकरांच्या शाळा उध्वस्त करू नका- बाळेश नाईक
यावेळी बोलताना बाळेश नाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील ६४ हजार ४४४ सरकारी शाळांपैकी हजारो शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विजेचे कनेक्शन आणि खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असताना, सरकार त्याकडे कायम दुर्लक्ष करत आहे. नवीन शैक्षणिक धोरण आणि १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जुलमी शासन निर्णय लागू करून प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाचे खासगीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे. वाड्या-वस्त्यांवर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त व कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणातून हद्दपार करण्यासाठीच कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद केल्या जात आहेत. एक जरी विद्यार्थी असला तरी ती शाळा सुरूच राहिली पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या मोर्चात माजी नगरसेवक उदय कदम, कॉम्रेड संजय तर्डेकर, दत्तात्रय मगदूम, संजय चाळक, प्रकाश इंगळे, मधुकर येसणे, तानाजी कुराडे, सुभाष निकम, तानाजी जोशीलकर, आदेश पाटील, सागर शिंदे, संतोष सुपले, रावसाहेब पाटील, शंकर नाईक मल्लिकार्जुन नाईकवाडी शिवाजी सावंत, कृष्णाराव सुतार, शिवाजी देसाई, तुकाराम पाटील, प्रवीण कुमार चिमणे, सुभाष सावंत, सम्राट मोरे, अजय मगदूम यांच्यासह पालक व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



